पुणे : राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीचा परिणाम जिल्ह्यातही होण्याची शक्यता असून, पालकमंत्री पद अजित पवार यांना दिले जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय होणार, असा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील समीकरणे बदलणार आहेत. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री कोण, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अशी पुणे जिल्ह्याची ओळख आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांना मिळणारी मंत्रिपदे, महामंडळे आणि राज्यमंत्री पदाबरोबरच अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद येईल, अशी चर्चा होत आहे.
हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
अजित पवार केवळ मंत्री नसून ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्याबाबतच्या कोणत्याही निर्णयात त्यांचा समावेश निश्चित असणार आहे. राजशिष्टाचाराचाही मुद्दाही यानिमित्ता पुढे आला आहे. उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नसले, तरी या पदाचा राजकीय मान आणि वजन मोठे असते. चंद्रकांत पाटील पालकमंत्री राहिल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती केवळ एक सदस्य म्हणून कशी सहभागी होणार, असा प्रश्न अजित पवार यांच्या समर्थकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे येईल, असा दावा केला जात आहे.