पुणे : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) हाती घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील भक्ती-शक्ती मार्गावरील मेट्रो मार्गिका तळवडेपासून पुढे चाकणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळापर्यंत (एमआयडीसी) नेण्यात येणार आहे. मात्र, या मार्गावरील बहुतांश स्थानिक नागरिक हिंजवडी आणि चाकण एमआयडीसीमध्ये कामासाठी ये-जा करत असतात. त्या दृष्टीने या नागरिका्ंना जास्तीजास्त कसा फायदा होईल, त्यांना मेट्रोचा सहज लाभ कसा घेता येईल, वाहतुकीचा ताण कसा कमी होईल, या दृष्टीने चाचपणी करून पर्यायी मार्गांची पाहणी करावी,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महामेट्रो’ला दिल्या.
पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी आणि भविष्यातील मेट्रो विस्ताराच्या आराखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी सात वाजता ‘महामेट्रो’च्या कार्यालयात बैठक घेतली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पदाधिकारी आणि संचालकांबरोबर त्यांनी बैठक घेतली.
‘महामेट्रो’च्या प्रस्तावित मेट्रो मार्गानुसार भक्ती-शक्ती चौकापासून पुढे मुकाई चौक, भूमकर चौक, भुजबळ चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, वल्लभनगर, टाटा मोटर्स कंपनी, तळवडे असा सुमारे ४१ किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. मात्र, पिंपरी आणि इतर परिसरातून यामार्गाद्वारे पुढे ‘एमआयडीसी’पर्यंत कामगार आणि नागरिक प्रवास करत असतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हिंजवडी आणि चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित आराखड्यात आणखी पर्य़ायी सेवा कशी देता येईल, त्यांना मेट्रोचा कसा लाभ होईल, विशेषतः चाकण ‘एमआयडीसी’तील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा मेट्रो कसा फायद्याचा ठरेल, या दृष्टीने मेट्रो स्थानिक भागातून वळविणे शक्य आहे किंवा नाही, याची चाचपणी करून पर्याय तयार करावेत,’ अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत.
‘डबल डेकर पुलांबाबत सूचना’
रामवाडी ते वाघोली या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेवरील दुहेरी उड्डाणपूल (डबलडेकर) आणि सासवड मार्गावरील उड्डाणपूल संदर्भात चर्चा केली. यावेळी वाघोली मार्गावरील उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे, तर सासवड रस्त्यावरील डबल डेकर पूल हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्याबरोबर करण्यात येत आहे. या विषयांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पवार यांनी अनेक सूचना केल्या.
या प्रस्तावित मेट्रो मार्गाला मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच विशेष बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत अंतिम ठराव आणि विस्तारीकरणावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार पवार यांनी ‘डीपीआर’मध्ये सुचविलेले काही बदल आणि तळवडेपासून पुढील मार्गाचा अंतर्भाव असा मिळून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, ‘महामेट्रो’