राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोनाच्या दुसऱ्या डोसवरून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांना इशारा दिलाय. “आगामी काळात या काही तालुक्यातील नागरिकांनी करोना विरोधी लसीच्या दुसऱ्या डोसला प्रतिसाद न दिल्यास पुढील बैठकीत यावर कारवाईबाबत कडक आणि कठोर निर्णय घ्यावा लागेल,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “प्रशासनाने करोना लसींच्या डोसबाबत माहिती दिली. पुण्यात पहिला डोस १०० टक्क्यांच्या जवळपास झाला आहे. परंतु दुसऱ्या डोसचं प्रमाण त्यामानाने फार कमी आहे. हे प्रमाण देखील वाढलं पाहिजे. मागील १० दिवसांची सरासरी पाहिली तर ती ६० ते ७० हजारांपर्यंत जाते. १० ते १२ दिवसांमध्ये साधारतः ७ ते ८ लाख लोकांनी डोस घेतलाय. लोक प्रतिसाद देत आहेत, मात्र बारामती, इंदापूर, दौंड अशा ४-५ तालुक्यांमध्ये दुसऱ्या डोसची पुरेशी संख्या पाहायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दोघांनाही जिल्ह्यातील यंत्रणांना कामाला लावण्याचे आदेश दिले आहेत.”

“…तर लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांविरोधात कठोर आणि कडक निर्णय घेऊ”

“या ठराविक तालुक्यांमध्ये दुसऱ्या लसीच्या डोसची संख्या वाढावी म्हणून या आठवड्यात प्रशासनाला संधी दिलीय. त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू. त्या शहरातील, तालुक्यातील लोकांनी सहकार्य केलं नाही, तर पुढील बैठकीत त्याबाबत आम्ही थोडासा कठोर आणि कडक निर्णय घेऊ. कारण तज्ज्ञांनी काहीही करा पण प्रत्येक जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातील जनतेला लसीचे दोन्ही डोस देण्याचा सल्ला दिला आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने…”, आशिष शेलारांचा पवार कुटुंबावर अप्रत्यक्ष हल्लाबोल

“काही तालुक्यांमध्ये सलग ७२ तास ओळीने उभं राहून लसीकरणाचा कार्यक्रम”

“मधल्या काळात रक्ताचा तुटवडा होता तेव्हा आमच्या पोलीस दलाने आणि सगळ्या प्रशासनाने मनावर घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं. त्यामुळे आपल्याला आलेला रक्ताचा तुटवडा दूर झाला. याआधी आपण लसीकरणाचा देखील मोठा कार्यक्रम राबवला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यात, पिंपरी चिंचवड आणि काही तालुक्यांमध्ये तर सलग ७२ तास ओळीने उभं राहून लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला. आता व्हॅक्सिन व्हॅन देखील आहेत. त्यामुळे जागेवर जाऊनही लसीकरण करता येतं,” असंही पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar warn baramati indapur daund citizens over corona vaccine second dose pbs
First published on: 10-12-2021 at 14:16 IST