लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गणेशोत्सवात शहरासह जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीची सर्व दुकाने १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ नुसार किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ आणि २८ सप्टेंबर असे दोन्ही पूर्ण दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील, तर २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा… “शिंदे- फडणवीस सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून…” सचिन अहिर यांचं वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच गणेशोत्सवाचा पाचवा आणि सातवा संपूर्ण दिवस ज्या भागात पाचव्या, सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते अशा भागातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असतीलल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री परवानाधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.