पिंपरी : आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून, कोणत्या मतदारसंघातून लढायची, या विषयी अद्याप काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन, असे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी सांगितले. तसेच एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे, असेही मत त्यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या सातत्याने चर्चा होत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही कोल्हे हे भाजपामध्ये आल्यास काही हरकत नाही. पण, शिरुरमधून लढण्यावर मी ठाम आहे. डॉ. कोल्हे दुसऱ्या मतदारसंघातून लढल्यास मी त्यांचा प्रचार करेन, अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – महिलेला काढायला लावल्या १५० उठाबशा; देहूरोड येथील घटना

या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे म्हणाले, की पुढची लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून, कोणत्या मतदारसंघातून लढायची, या विषयी काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन. एखादे पद मिळालेच पाहिजे, असा अट्टाहास असता कामा नये. लोकांच्या हितासाठी, प्रश्नांसाठी काम करत राहणे केव्हाही चांगले. पद, प्रतिष्ठा, पैसा हे एकीकडे ठेवले तरी महाराजांचा जिरेटोप, कवड्यांची माळ असणारे दुसरे पारडे माझ्यासाठी कायमस्वरुपी महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – ‘द केरला स्टोरी’ चित्रपट विनामूल्य दाखविणे चुकीचे, राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका

३५० वर्षे मागे जाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याची संधी मिळते, हेच माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार, एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe reaction on upcoming lok sabha elections pune print news ggy 03 ssb
First published on: 10-05-2023 at 15:18 IST