राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निवडणूक प्रचारात छाती ठोकून बैलगाडी शर्यतीबाबत दिलेला शब्द अखेर पूर्ण केला. बारीत घोडेस्वारी केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दंड आणि मांड्या थोपटत शब्दपूर्तीचा आनंद व्यक्त केला. त्यांनी स्वतः याबाबतचा जुना आणि घोडेस्वारी पूर्ण केल्याचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय. हा व्हिडीओ पोस्ट करताना आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला, असंही त्यांनी नमूद केलं.

अमोल कोल्हे ट्वीटमध्ये म्हणाले, “भिर्रर्रर्र..! कुलदैवत खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन आज घाटात घोडी धरली आणि भंडाराही उधळला.”

अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये प्रचारसभेत दिलेल्या आपल्या आश्वासनाचा आणि घोडेस्वारी करून शब्द पूर्ण केल्याचा व्हिडीओ आहे. याशिवाय बारीत घोडेस्वारी पूर्ण केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दंड आणि मांड्या थोपटत आपला आनंद व्यक्त केला.

“जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा…”

अमोल कोल्हे म्हणाले, “जेव्हा तुमच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा महाराजांची शिकवण आहे भिंतीला पाठ लागल्यानंतर उसळायचं असतं. त्यामुळे ज्यांना घोडी धरेल की नाही अशी शंका होती त्यांना उत्तर मिळालंय. दोन्ही हात सोडून अख्खा घाट घोडेस्वारी केलीय. संसदेचं काम सुरू असताना घाटात येणं शक्य नसल्याने आत्ता घोडेस्वारी केली.”

“घाटात घोडी चालवण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे. पण जनावरांची एक भाषा असते, त्यांच्यासोबत एक नातं असतं. मुक्या प्राण्याशी सर्वसामान्य शेतकऱ्याचं एक नातं असतं. जसं माझं माझ्या घोडीशी नातं आहे. त्यामुळे मी तिला सांगितलं माझी काळजी तू घे, तुझी काळजी मी घेतो,” असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

अमोल कोल्हे म्हणाले, “अनेकांना वाटतं चित्रिकरण सोपं असतं, पण ना चित्रिकरण सोपं असतं, ना ही प्रत्यक्षातील घोडेस्वारी सोपी आहे. आव्हान समोर आलं की भिडायचं असतं. आव्हानाला भिडलं की आव्हान सोपं होतं. यापुढील काळातही बैलगाडीची आणखी लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. त्यातून पर्यटन, ग्रामीण रोजगार याला नक्कीच प्रयत्न करत राहू.”

हेही वाचा : VIDEO: अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बैलगाडी शर्यतीचा प्रश्न अद्याप पूर्ण सुटलेला नाही. त्यावर पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यासाठी दस्तावेजीकरण आणि इतर पाठपुरावा आम्ही करू,” असंही कोल्हेंनी नमूद केलं.