पुणे: भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नंदकिशोर धोंडू महाडिक (वय ६०, रा. एरंडवणे गावठाण) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत कुणाल मोरे (वय २७, रा. नवी पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांच्याकडे महाडिक सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. १ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास महाडिक कर्वे रस्त्यावरून निघाले होते. गरवारे महाविद्यालय चौकाजवळ असलेल्या सिग्नलजवळ त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महाडिक यांचा मृत्यू झाला.
पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.कर्वे रस्ता भागात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश अपघात भरधाव वाहनचालकांच्या चुकांमुळे घडले आहेत.
गेल्या वर्षभरात कर्वे रस्ता भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.