स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची डोकेदुखी येत्या काळात वाढणार आहे. अॅडवेअर आणि ट्रोजन एसएमएसच्या माध्यमातून व्हायरस अॅटॅक होत असून गेल्या वर्षांच्या तुलनेत त्याचे प्रमाण तिप्पट झाल्याचे डिजिटल सिक्युरिटी सव्र्हे करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या अहवालांमध्ये म्हटले आहे. विंडोज फोन्सपेक्षाही अँड्रॉईड फोन्सना व्हायरसचा धोका जास्त आहे.
जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला स्मार्टफोन हा आता धोकादायकही ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्फिग, चॅटिंग यांच्याबरोबरच ऑनलाईन खरेदीसाठीही स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. त्यामुळेच आता व्हायरस तयार करणाऱ्यांनी स्मार्टफोन्सला लक्ष केले आहे. अॅडवेअर्स आणि ट्रोजन एसएमएसच्या माध्यमातून व्हायरस पसरण्याचे प्रमाण तिपटीने वाढल्याचे विविध संस्थांनी त्यांच्या सर्वेक्षणात नमूद केले आहे. ऑनलाईन शॉपिंग आणि मोबाईल बॅंकिंगला लक्ष्य केले जात असल्याचे निरीक्षणही या अहवालांमध्ये नोंदवण्यात आले आहे.
इन्टरपोल आणि कॅस्पर्सकी लॅबने २०० देशांमधील ५० लाख अँड्रॉईड फोन्सचे सर्वेक्षण केले. त्यानुसार ट्रोजन एसएमएसच्या माध्यमातून व्हायरस पसरत आहेत. मोबाईलवरील माहिती या व्हायरसमुळे धोक्यात येते. भारतात हे प्रमाण दीड टक्के आहे. पैशाच्या आमिषाचे मेसेज पाठवून हा व्हायरस पसरवला जात आहे. त्याचप्रमाणे गुगल प्लेच्या माध्यमातून डाऊनलोड करण्यात येणाऱ्या अॅप्समाधूनही व्हायरस पसरत आहेत. क्विक हिलनेही त्यांचा तिसऱ्या तिमाहीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार अँड्रॉईड फोन्सवर पसरणाऱ्या व्हायरसपैकी ५३. ४० टक्के प्रमाण हे अँड्रॉईड.व्हायसर.ए या व्हायरसचे आहे. हा व्हायरस फोनवर अनावश्यक जाहिराती दाखवतो. त्या माध्यमातून फोनमध्ये प्रवेश केल्यानंतर फोनचा आयएमईआय क्रमांक हा व्हायरस उघड करतो. क्रिप्टो रॅनसमवेअर हा व्हायरस पसरण्याचे प्रमाणही अधिक असून येत्या काळातही ते कायम राहू शकते असे या अहवालात म्हटले आहे. या तिमाहीत क्विक हिलने अँड्रॉईड मॅलमोअरचे २१८ नवे प्रकार शोधून काढले आहेत.
काळजी कशी घ्यायची
– फोनवरील माहिती पासवर्ड वापरून सुरक्षित करावी.
– फोनवरून बॅंकिंग करताना सुरक्षेसाठी किमान दोन टप्प्यांमध्ये खातरजमा करावी.
– अधिकृत अॅपच्या माध्यमातूनच खरेदी करावी, इमेल्स, लिंक्सच्या माध्यमातून खरेदी करू नये.
– मोबाईलच्या माध्यमातून वस्तू खरेदी करण्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते आणि कार्ड्स ठेवावीत.
– व्हायरसचा हल्ला झाल्याची अथवा माहिती उघड झाल्याची शंका आल्यास सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार करावी.
– सुरक्षित वाय-फाय कनेक्शनच्या माध्यमातूनच नेट वापरावे.