पुणे : चित्रपट, तमाशा आणि अन्य कलांपुरतेच ‘स्त्री’ला मर्यादित ठेवले जात होते. मात्र, त्याची सीमा ओलांडून अण्णा भाऊ साठे यांनी ‘स्त्री’ला साहित्यामध्ये पराक्रमी, स्वाभिमानी नायिका केले. त्यांचे हे मोलाचे योगदान आहे, असे मत माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी येथे व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सहस्रबुद्धे बोलत होते. संमेलनाध्यक्ष संपत जाधव, अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, स्वागताध्यक्ष, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री प्रा. डाॅ. लक्ष्मण ढोबळे, आमदार सुनील गोरखे या वेळी उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले.
सहस्रबुद्धे म्हणाले, ‘मराठी साहित्यामध्ये प्रथमच ठळकपणे दलित, उपेक्षित माणसाच्या वेदना अण्णा भाऊ साठे यांनी मांडल्या. त्यांचा आवाज होऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली. साहित्यातील कथा, कादंबरी, लोकनाट्य, कविता यांसारखे सर्व प्रकार लिहून त्यांनी एक इतिहास निर्माण केला.’
‘अण्णा भाऊ यांचे साहित्य घराघरांत पोहोचणे काळाची आवश्यकता आहे. दलित, उपेक्षित आणि वंचित माणसाला साहित्यातून त्यांनी न्याय दिला. त्यांचे साहित्य देशातील सर्व भाषांमध्ये प्रकाशित करण्याचे काम राज्य शासनाने करावे,’ असे संपत जाधव यांन सांगितले.
अण्णा भाऊ यांचे साहित्य माणसाच्या हृदयाला हात घालणारे होते. अलीकडच्या पिढीने विविध विषयांवर संशोधन करावे, अशी अपेक्षा डाॅ. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली. सुनील वारे यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली. स्वागताध्यक्ष दिलीप कांबळे यांनी संमेलनातील उपक्रमांची माहिती दिली.