पालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, जमातींसाठीचे आरक्षण जाहीर; अनुसूचित जातींसाठी २३, तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा आरक्षित

आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जातीसाठी २३, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ जागा असतील. येत्या काही दिवसांत महिलासांठीचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार आहे. त्यानुसार ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. शहरातील एकूण ५८ प्रभागांपैकी ५७ प्रभाग त्रिसदस्यीय पद्धतीचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून गेल्या आठवडय़ात जाहीर करण्यात आल्यानंतर प्रभागांचे नकाशे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पुढील टप्प्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी २३, तर अनुसूचित जमातींसाठी २ प्रभाग आरक्षित झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण रद्दबातल केले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. संबंधित प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षण निश्चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आली. येत्या काही दिवसांत पन्नास टक्के महिला आरक्षण जाहीर झाल्यानतंर कोणती जागा महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असेल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. पन्नास टक्के महिला आरक्षणानुसार ५८ प्रभागांपैकी २९ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला उमेदवार असतील. एक खुल्या प्रवर्गातील तर एक आरक्षित प्रवर्गासाठी जागा असेल.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचे तेवीस आरक्षित प्रभाग

पुणे स्थानक-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (प्रभाग क्रमांक २०), सहकारनगर-तळजाई (प्रभाग क्रमांक ५०), अप्पर सुप्पर-इंदिरानगर (प्रभाग क्रमांक ४८), कळस-फुलेनगर (प्रभाग क्रमांक ८), कासेवाडी-लोहियानगर (प्रभाग क्रमांक २७), येरवडा (प्रभाग क्रमांक ९), बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रभाग क्रमांक ११), कल्याणीनगर-नागपूर चाळ (प्रभाग क्रमांक ७), जनता वसाहत-दत्तवाडी (प्रभाग क्रमांक ३७), शिवदर्शन-पर्वती (प्रभाग क्रमांक ३८), धानोरी-विश्रांतवाडी (प्रभाग क्रमांक १), रामटेकडी-सय्य्दनगर (प्रभाग क्रमांक ४२), वानवडी गावठाण-वैदुवाडी (प्रभाग क्रमांक २६), मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी (प्रभाग क्रमांक २२), शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी (प्रभाग क्रमांक १०), मार्केटयार्ड-महर्षीनगर (प्रभाग क्रमांक ३९), कोरेगांव पार्क-मुंढवा (प्रभाग क्रमांक २१), कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी (प्रभाग क्रमांक ४७), मोहमंदमवाडी-उरूळी देवाची (प्रभाग क्रमांक ४६), छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक १९), पूर्व खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक ४), औंध-बालेवाडी (प्रभाग क्रमांक १२), लोहगांव-विमानगर (प्रभाग क्रमांक ६) या प्रभागातील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारासाठी राखीव असेल.

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीचे आरक्षित प्रभाग- एकूण दोन जागा

  • धानोरी-विश्रांतवाडी (प्रभाग क्रमांक १)
  • पाषाण-बावधन बुद्रुक (प्रभाग क्रमांक १४)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Announcement of reservation municipal elections reserved scheduled castes scheduled tribes ysh

Next Story
येतोय पावसाळा, विजेचा लपंडाव टाळा..; पावसाळापूर्व वीज यंत्रणेच्या देखभालीचे काम वेगात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी