पुणे : वीज चोरीच्या गुन्ह्यात मदत करणे, तसेच अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेण्यासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली.

सोमनाथ बापू महानवर (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. न्यायालयाने सोमनाथ यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी निवृत्त पोलीस कर्मचारी युवराज कृष्णा फरांदे (वय ५९) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४४ वर्षीय तक्रारदाराविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सोममाथ महानवर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदारांकडे दहा हजार रूपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

चौकशीत तक्रारदाराच्या घरमालकाकडून पोलीस कर्मचारी महानवर यांनी सुरुवातीला पाच हजार रुपयांची लाच घेतली होती. उर्वरित रक्कम महानवर यांनी घरमालकाला देण्यास सांगितले होते. मंगळवारी सायंकाळी सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. चौकशीत निवृत्त उपनिरीक्षकाने महानवरला लाच मागण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक आसावरी शेंडगे तपास करत आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाची बदली

ज्या पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होईल, त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तातडीने बदली करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तेथील पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांची सोमवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संतोष पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.