पुणे : ‘स्वत:च्या नावावर असलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका मिळकतकरात ४० टक्के सवलत देते. यासाठी संबधित नागरिकांकडून ‘पीटी-३’ अर्ज भरुन घेतले जातात. मात्र, शहरातील अनेक नागरिकांनी हे अर्ज भरुन दिल्यानंतरही महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे त्यांना सवलत मिळालेली नाही. त्यामुळे सवलतीच्या दरात पुणेकरांना मिळकतकर भरता यावा, यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी,’ अशी मागणी केली जात आहे.
‘आपला परिसर’ संस्थेचे उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी ही मागणी केली असून याबाबत निवेदन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.
महापालिकेचा मिळकतकर ३० जूनपर्यंत भरल्यास मिळकतदारांना बिलामध्ये पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. ही मुदत संपण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक राहिल्याने सवलत घेण्यासाठी नागरिकांनी कर भरणा केंद्रात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचा ९५० कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. सवलतीची मुदत जवळ आल्याने दिवसाला सर्वसाधारण ५० कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळत आहे.