पुणे : काश्मिरमधील देशी सफरचंदांचा हंगाम नुकताच सुरू झाला असून, काश्मिर, हिमाचलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देशी सफरचंदांची आवक ठप्प झाली आहे. बाजारात देशी सफरचंदांची आवक कमी प्रमाणावर होत असल्याने देशी सफरचंदांच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
देशी सफरचंदांचा हंगाम दरवर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. श्रावण महिना, तसेच गणेशोत्सवात देशी सफरचंदांच्या मागणीत वाढ होते. काश्मिर, हिमाचल प्रदेशातून आवकही मोठ्या प्रमाणावर होते. नवरात्रौत्सवात मोठ्या उपवास केले जातात. उपवासाच्या काळात सफरचंदांच्या मागणीत वाढ होते. मात्र, यंदा काश्मिर, हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी झाल्याने आठवडाभरापासून बाजारात देशी सफरचंदांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने सफरचंदांच्या दरात किलोमागे ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंद व्यापारी सत्यजीत सुयोग झेंडे यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे काश्मिर, हिमाचल प्रदेशातील रस्ते वाहून गेले आहेत. राडारोड्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी आणखी काही दिवस लागणार असून, त्यानंतर सफरचंदांची आवक सुरुळीत होईल. काश्मिरमधील सफरचंदांची आवक बाजारात दररोज आठ ते दहा हजार पेटी होत होती.
अतिवृष्टीमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रस्ते वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे रेल्वेतून सफरचंदाची आवक होत आहे. छोट्या गाडीतून श्रीनगरहून जम्मूला सफरचंदे आणण्यात येतात. तेथून ट्रकमधून सफरचंदे देशभरात विक्रीस पाठविण्यात येतात. बाजारात सफरचंदांची आवक उशिराने होते. हाताळणीमुळे सफरचंदाच्या प्रतवारीवर परिमाण हाेतो, असे त्यांनी नमूद केले.
देशी सफरचंद आरोग्यदायी
पावसाळ्यात हिमाचल प्रदेश, काश्मिरमधील देशी सफरचंदाचा हंगाम सुरू होता. श्रावण महिना, गणेशोत्सव, तसेच नवरात्रौत्सवात सफरचंदांच्या मागणीत मोठी वाढ होते. सध्या बाजारात देशी सफरचंदांची आवक कमी होत आहे. परदेशातील टर्की, दक्षिण आफ्रिका, ,चिलीतील सफरचंदे बाजारात उपलब्ध आहेत. परदेशी सफरचंद चककीत असतात. ही सफरचंदे शीतगृहात साठविण्यात आलेली असतात. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंद ताजी असतात. परदेशी सफरचंदांच्या तुलनेत देशी सफरचंद आराेग्यदायी आहेत.
सफरंचंदाचे दर
- घाऊक बाजारातील दर – २५०० ते ३००० (२२ ते २५ किलो पेटी)
- किरकोळ बाजारातील दर – २५० ते ३२० रुपये (प्रतिकिलो)