नारायणगाव : भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगडसह ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने याबाबतचा अहवाल तयार करून तो युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे पाठविला आहे. जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने शिवनेरी, रायगडसह राज्यातील ११ आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश असलेला अहवाल युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे पाठविला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील अनेक गडकिल्ले मराठ्यांच्या वैभवशाली सोनेरी इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी शिफारस करण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली होती. शेखावत यांनी दिलेल्या निर्देशानुसार भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने ‘भारताचे मराठा सैनिकी लँडस्केप्स’ अहवाल तयार करून युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे सादर केला आहे.
शिफारस केलेले किल्ले
भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाने राज्यातील रायगड, राजगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा, विजयदुर्ग, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या ११ किल्ल्यांचा आणि तामिळनाडूमधील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश केला आहे. केंद्रीय मंत्री शेखावत यांनी खासदार डॉ. कोल्हे यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री शेखावत यांनी मागणीची दखल घेऊन छत्रपती श्री शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत नामनिर्देशित करण्यासाठीच्या यादीत केला आहे. जागतिक वारसा यादीत गडकिल्ल्यांचा समावेश झाल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांची माहिती जागतिक पटलावर येईल.खासदार डॉ. अमोल कोल्हे</p>