नारायणगाव : आंबेगाव तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १ लाख ९० हजार ३७० रुपयांना लुबाडले. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. दरोडेखोरांनी पळून जाताना हवेत गोळीबार केला.

पुणे नाशिक महामार्गावर तांबडेमळा (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून चार दरोडेखोर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पंपावर आले. यावेळी पेट्रोल पंपावर कार्यालयात दोन, तर बाहेर दोन कर्मचारी कार्यरत होते. दोन सशस्त्र दरोडेखोर पंपावरील कार्यालयात आले. उर्वरित दोन बाहेर लक्ष ठेवण्यासाठी उभे राहिले. त्यांनी पेट्रोल टाकणाऱ्या दोघांना जिवे मारण्याची धमकी दिली. आत आल्यावर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून पैशांची मागणी केली. दरोडेखोरांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले १ लाख ९० हजार ३७० रुपये काढून घेऊन पोबारा केला. चोरटे बराच वेळ पंपावर होते. चारही जणर एकाच मोटारसायकलवर आले होते. चोरी करून परत चालत जाताना एक चोरटा खाली पडला. त्या वेळी त्याने हवेत गोळीबार केला. चोरटे मोटरसायकलवरून नाशिकच्या दिशेने पळून गेले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरोडेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी दाखल झाले आहे. श्वान पथकाने दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिथे मोटरसायकल उभी केली होती तिथपर्यंत श्वान पोहोचले. ठसेतज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी रात्री भेट दिली. तपासासाठी पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. ‘सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहोत, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे,’ असे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.

‘पेट्रोल पंपचालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी. चांगले सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच, पेट्रोल पंपावर लाईट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावा,’ असे आवाहन कंकाळ यांनी केले आहे.