लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: बँकेत रोकड भरणा करणाऱ्या खातेदारांकडे बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन रोकड चोरणाऱ्या हरियाणातील चोरट्यांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी पुणे शहरासह परराज्यात फसवणुकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून १९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दीपककुमार ओमप्रकाश मेहंगी (वय ४७), सुनिल रामप्रसाद गर्ग (वय ३७, दोघे रा. पानिपत, हरियाणा), सूरजकुमार ओमप्रकाश मेहंगी (वय २९, रा. हरीयाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा… पावसाला विलंब; ‘या’ पिकांच्या लागवडीत घट
लष्कर भागातील एका बँकेतून रोकड काढण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. फिर्यादी व्यावसायिकाने बँकेतून तीन लाख रुपये काढले होते. त्या वेळी बँकेत थांबलेला आरोपी दीपककुमारने बँक कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. तक्रारदार व्यावसायिकाने बँकेतून रोकड काढली. तेव्हा नोटांच्या एक बंडलात कमी रक्कम असल्याचे आरोपी दीपककुमारने सांगितले. व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवून दीपककुमारने तीन लाखांची रोकड लांबविली.
हेही वाचा… पुण्यात जूनमध्ये पडला एवढा पाऊस
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले हाेते. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीपककुमार याच्यासह साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी पुणे शहरासह गुजरात आणि मध्यप्रदेशात बँक खातेदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा… पर्यटकांचं आकर्षण असलेलं लोणावळ्यातील ‘भुशी धरण’ ओव्हरफ्लो
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियंका शेळके, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, महेश कदम, विलास शिंदे, अतुल मेंगे, मंगेश बोऱ्हाडे, रमेश चौधर आदींनी ही कारवाई केली.