लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने पुणे शहरातील गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर दुबईत पसार झालेले आरोपी अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा यांच्याविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविले आहे. राठोड दाम्पत्याने शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सहाशेहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस झाले आहे.

राठोड दाम्पत्य सध्या दुबईत वास्तव्यास आहे. त्यांना पकडण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात येणार आहे. राठोड दाम्पत्याविरुद्ध २० एप्रिल २०२३ रोजी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत डॉ. जगदीश जाधव यांनी फिर्याद दिली होती. प्राथमिक तपासात दाम्पत्याने दहा जणांची १६ कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

फसवणुकीची व्याप्ती वाढल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ५१ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान राठोड दाम्पत्य दुबईला पसार झाल्याचे उघडकीस आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी राठोड दाम्पत्याने ‘एपीएस वेल्थ व्हेंचर एलएलपी’ नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. राठोड दाम्पत्य पसार झाल्यानंतर रेड कॉर्नर नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोघांना ताब्यात घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपींविरुद्ध लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.