श्रीराम ओक

समाजातील एखादा प्रश्न किंवा विषय हाती घेऊन तो सोडवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था पुण्यात आहेत. या संस्थांनी सेवाध्यासाचा आदर्श उभा केला आहे. विविध सामाजिक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी कार्य करणाऱ्या अशा संस्थांची ओळख ‘सेवाध्यास’ या सदरातून होईल. ज्या योगे एखादी समस्या उद्भवली, तर संबंधित सामाजिक संस्थेची जशी मदत घेता येईल, तसेच विशिष्ट सेवाकार्यासाठी आर्थिक योगदानापासून ते संस्थेसाठी काही वेळ देण्याची इच्छा असणाऱ्यांपर्यंत सर्वाना उपयुक्त माहितीही मिळू शकेल.

समाजात काही बदल घडले पाहिजेत, ही तळमळ असणारा कार्यकर्ता कोणत्याही क्षेत्रात सामाजिक कार्य करू शकतो, हे जाणवते अनुप कुलथे, अश्विन गोडबोले आणि कपिल जगताप या त्रयीकडे बघितल्यानंतर. विविध गोष्टींपासून वंचित असणाऱ्या व्यक्तींना समाजाला काही देता यावे यासाठी जसे सामाजिक कार्य केले जाते, तसेच काही गोष्टी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठीदेखील विशेषत्वाने कार्य केले जाते. अनुप, अश्विन आणि कपिल ही त्रयी संगीतक्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच कानसेनांना उत्तमोत्तम कलाकारांकडून अनवट संगीत ऐकण्याची संधी उपलब्ध करून देते. हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून त्यांनी आजपर्यंत त्यांच्या ‘शुद्धनाद’ या संस्थेतर्फे तेहतीस छोटेखानी विनामूल्य मैफिली घडवून आणल्या आहेत. या मैफिलींच्या माध्यमातून त्यांनी शंभरहून अधिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली हेदेखील तेवढेच महत्त्वाचे.

शुद्धनादद्वारे अभिव्यक्तीशी संगीत जोडले जाते तसेच संगीताद्वारे मानसिक आनंदाबरोबरच मनोरंजनही होते. संगीतामुळे ताणतणावांपासूनदेखील श्रोता काही काळासाठी मुक्ती मिळवू शकतो. अनुप, अश्विन आणि कपिल या तिघांनाही असलेल्या संगीत अभिरुचीमुळे ‘शुद्धनाद’ची निर्मिती झाली. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ मिळावे तसेच तरुणाईला संगीताचा आनंद घेता यावा, तरुणाईमध्ये संगीताची आवड निर्माण व्हावी, तरुणाईला अनवट आणि भिन्न संगीत वेगळ्या वातावरणात ऐकायला मिळावे या उद्देशाने या संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली.

मित्राच्या घरी ‘चला रे रियाझाला बसू’ या कृतीतून  ‘शुद्धनाद’ संस्थेचे बीज पेरले गेले. एकत्रित रियाझ करताना आपल्याच मित्रमंडळींना तो ऐकायला का बोलवू नये?  या भावनेतून त्यांची मित्रमंडळी जमू लागली. हा उपक्रम जसाजसा नियमित होत गेला तसतसा या उपक्रमाला मूर्त स्वरूप द्यायचा या तिघांचा विचार दृढ झाला. सर्वात सुरुवातीला अनुपच्या घरी धनकवडी येथे मासिक मैफिलीच्या उपक्रमाला सुरुवात झाली. ज्यात दोन उदयोन्मुख कलाकारांना गायन, वादन प्रस्तुतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. श्रोतृवर्गाला ही संकल्पना खूपच आवडल्याने अशा प्रकारचे उपक्रम वारंवार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत गेले आणि धनकवडीतील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे मध्यवर्ती भागात म्हणजे सदाशिव पेठेत कपिलच्या घरी कार्यक्रम करण्याचे ठरले. यातून संस्था नावरूपास येऊ लागली होती, त्यातून ऑक्टोबर २०१५ पासून सलग नऊ महिने सातत्याने अशा प्रकारच्या एकत्रित आयोजिलेल्या संगीतास्वादाला त्यांनी ‘छोटेखानी मैफल’ असे नाव दिले आणि १४ जुलै २०१६ रोजी ‘शुद्धनाद’ संस्थेचा जन्म झाला.

‘शुद्धनाद’ हा उभरत्या कलाकारांसाठीचा खुला मंच असून येथे कलाकार आपली कला मोकळेपणाने सादर करतो. कलाकार आणि श्रोता यांच्यातील अंतर कमी करण्याचा उद्देश ठेवून ही मासिक ‘छोटेखानी मैफल’ आयोजित केली जात असल्याचे कपिल आवर्जुन सांगतो. जशी उदयोन्मुख कलाकारांची पिढी घडते आहे तशीच उत्तम श्रोत्यांची सुद्धा पिढी घडवावी यासाठी  ‘शुद्धनाद’ प्रयत्नशील आहे.

छोटेखानी मैफल आयोजित करण्यासाठी आर्थिक पाठबळ नव्हते. तरीही सुरू ठेवलेल्या या उपक्रमात चांगले ध्येय मनात ठेवून चालू केलेल्या या उपक्रमाला अनेकानेक मित्रांच्या शुभेच्छांची आणि रसिकांच्या प्रोत्साहनाची जोड मिळाल्याचे अनुप सांगतो. या आर्थिक चणचणीत त्यांच्या पालकांनी दिलेले प्रोत्साहन हेदेखील वाखाणण्यासारखे होते. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाने या तिघांना मनोधैर्य कायम टिकवून ठेवता आले.   पाहता-पाहता  ‘शुद्धनाद’ पंचविसाव्या छोटेखानी मैफलीपर्यंत येऊन ठेपली, त्यावेळी त्यांनी आवर्जून ज्या कलाकारांनी शुद्धनादच्या पहिल्या मैफलीमध्ये कला प्रस्तुती केली होती त्यांनाच आमंत्रित केले. सुरुवातीला केवळ संध्याकाळीच मैफली आयोजित केल्या जायच्या, पण नंतर मात्र सर्व प्रहरांमधील राग ऐकता यावेत म्हणून संस्थेने काही मैफिली प्रहराला अनुसरून केल्या. या प्रयोगाचे कलाकारांसह श्रोत्यांनीही स्वागत केले. याशिवाय एखाद्या विचारावर (थीमवर) आधारित मैफिलीदेखील संस्थेने आयोजित केल्या आहेत. त्यातील पहिली मैफल ही गझल व ठुमरी या उपशास्त्रीय गायनप्रकाराला समर्पित होती. दुसऱ्या मैफलीमध्ये आग्रा घराण्याचा इतिहास, परंपरा, आग्रा घराण्याच्या गायकीचे विविध पैलू आणि वैशिष्टय़े हा विषय रसिकांसमोर मांडला गेला.

छोटेखानी मैफिलींबरोबरच दोन व्यावसायिक कार्यक्रमदेखील संस्थेने आयोजित केले असून त्यात आतापर्यंत पं. अरुण कशाळकर, पं. व्यंकटेश कुमार, टी. एम. कृष्णा, डॉ. पूर्णिमा धुमाळे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना आमंत्रित केले आहे. संस्थेच्या या उपक्रमात कलाकार, श्रोता तसेच दाता म्हणून सहभागी होण्याची इच्छा असणारी मंडळी ९८२२३७३००७ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.