पिंपरी नाटय़ परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला असून, चिंचवडमधील भोईरनगर येथील मैदानात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार दिला जाणार आहे. एक लाख ११ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला पं. हृदयनाथ मंगेशकर, नाटय़परिषदेचे कार्यवाह दीपक करंजीकर, आमदार लक्ष्मण जगताप, आदी उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २००२ पासून हा पुरस्कार दिला जातो. शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या वाडकर यांनी चित्रपट संगीतात मोठे योगदान दिले आहे. १९७६ पासून त्यांनी विविध भाषांमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायली आहेत.