पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पुणे शहरात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी महापालिका प्रशासनाची पूर्ण झाली आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महापालिकेने केली असून, यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे महापालिकेसह विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी रस्त्याने शहरात दाखल होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दोन्ही पालख्याचे दर्शन घेऊन वैष्णवांचे पुणे शहरात स्वागत करणार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. शनिवारी दिवसभराच्या मुक्कामानंतर रविवारी (२२ जूनला) पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.

दरम्यान, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि सर्वसामान्य पुणेकरांनी तयारी केली आहे. पालखीच्या स्वागतासाठी चाैकाचाैकांत स्वागत कक्ष, स्वागत कमानी, पावसापासून वारकऱ्यांचा बचाव करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. सध्या पावसाचा जोर असल्याने रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने विविध पथके तैनात ठेवली आहेत.

मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था पूर्ण

पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर व पालखी विठोबा मंदिर परिसरामध्ये महापालिकेने मंडप व्यवस्था पूर्ण केली आहे. तसेच, येेथे मदत केंद्र, आगप्रतिबंधक सेवा केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, हरवलेल्या व्यक्तिंसाठी शोध व मदत केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र, जनजागृती केंद्र अशी व्यवस्था केली आहे. तसेच, प्रशासनासह व्यापारी, राजकीय नेते आणि सार्वजनिक मंडळांनी वेगवेगळ्या परिसरात पत्र्याचे शेड उभे करून वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची, भोजनाची व्यवस्था केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आहे व्यवस्था …

  • फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा
  • वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना) वैद्यकीय अधिकारी, फार्मसिस्ट, नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचार
  • महापालिकेच्या दवाखाने, प्रसुतिगृह, रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार
  • पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी
  • मुक्कामाच्या शाळांच्या ठिकाणी आग प्रतिबंधक दृष्टीने पाहणी
  • फुलेनगर व वाकडेवाडी या ठिकाणी अग्निशमन वाहने तैनात
  • मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे
  • महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार

महापालिकेचे आवाहन

  • नागरिकांनी, वारकऱ्यांनी पालखी मार्ग, पालखी निवास परिसरात जेथे महापालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहेत. तेथील पाणी प्यावे.
  • महापालिकेची सार्वजनिक शौचालये, मोबाईल टॉयलेटस, सुलभ शौचालये यांचा वापर करावा.
  • उघड्यावरील अन्नपदार्थ, चिरलेली व अतिपिकलेली फळे खाऊ नयेत.
  • केळींच्या, फळांच्या साली खाद्यपदार्थाचे कागद हा कचरा निश्चित केलेल्या कचरापेटीत टाकावा.
  • पालखी सोहळ्यात प्लास्टिक बॅगांचा वापर करू नये.

शहरात मुक्कामी येणाऱ्या पालखी सोहळ्याची सर्व तयारी महापालिकेने पूर्ण केली असून, वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका