पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी मंगळवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करून हिरा आणि मोती या अश्वांनी गणरायाला वंदन केले. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष झाला. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे पुण्यामध्ये आगमन झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात अश्वांचे पूजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी राजे शितोळे, विहानराजे शितोळे, मोहिनीराजे शितोळे यांच्यासह पुणेकर या वेळी उपस्थित होते.रासने म्हणाले, ‘आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते मंदिरात येऊन या अश्वांचे दर्शन घेतात.’