पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघात सुरू असलेली विविध विकासकामे अतिशय संथपणे सुरू आहेत आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे, या कारणावरून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका अधिकाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त केला.

पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदारांनी पिंपळे गुरव येथे आढावा बैठक घेतली.  या  बैठकीस महापौर माई ढोरे, शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. अनेक ठिकाणी संथगतीने कामे सुरू असल्याबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यावरून आमदारांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा. विशेषत: खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, अशी तंबी आमदारांनी दिली. स्थापत्य विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदार संघात रस्ते, जलनिस्सारण, ग्रेडसेपरेटर यांसह अनेक मोठी कामे सुरू आहेत. कित्येक दिवसांपासून संथ गतीने काम होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. कामे संथ गतीने का सुरू आहेत, कामांना निधी कमी पडतोय की तुम्ही कर्तव्य बजावण्यात कमी पडताय, आदी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने आमदारांनी संताप व्यक्त केला.

आधी दुर्लक्ष, आता तत्परता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवीत तीन वर्षाहून अधिक काळ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी केलेल्या खोदाईमुळे स्थानिक रहिवाशी कमालीचे त्रस्त आहेत. चिंचवड मतदार संघाच्या इतर भागातील नागरिकांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था आहे. वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे आतापर्यंत कोणी लक्ष दिले नाही. मात्र, पालिका निवडणुकांच्या तोंडावर बैठक घेत आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन नागरिकांचा कळवळा आल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आमदारांनी केल्याची टीका या बैठकीवर होत आहे.