माॅडेल काॅलनीतील एका बँकेच्या एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्याने एटीएमची तोडफोड करुन पाच हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत कॅनरा बँकेच्या माॅडेल काॅलनी शाखेतील व्यवस्थापक वैजनाथ खैरे (वय ४२) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दीपबंगला चौकातील कॅनरा बँकेच्या शाखेत एटीएम आहे. एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्यांनी एटीएममधील संवेदक निकामी केला आणि चोरटा एटीएम केंद्राबाहेर पाळत ठेवून थांबला. काही वेळानंतर एक ग्राहक एटीएम केंद्रात गेला. त्याने एटीएम यंत्रातून पाच हजारांची रोकड काढली. चोरट्याने संवेदक निकामी केल्याने एटीएममधील ज्या भागातून नोटा बाहेर पडतात. तेथे पाच हजारांच्या नोटा अडकल्या. ग्राहकाने रोकड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोकड बाहेर काढता न आल्याने ग्राहक तेथून निघून गेला.
एटीएम केंद्राच्या बाहेर पाळत ठेवून थांबलेला चोरटा लगेचच एटीएम केंद्रात शिरला. ज्या भागात नोटा (कॅश डिसपेन्सर कव्हर) अडकल्या होत्या तो भाग स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन त्याने उचकटलं आणि पाच हजारांची रोकड लांबवून चोरटा पसार झाला. ग्राहकाच्या खात्यातून पाच हजारांची रोकड कमी झाल्याचा संदेश आल्यानंतर त्याने याबाबतची तक्रार बँकेकडे दिली. त्यानंतर बँकेकडून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार तपास करत आहेत