पूर्ववैमनस्यातून तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना धनकवडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाचजणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक रामलाल रजक (वय २६ रा. झांबरे बिल्डिंग, काशीनाथ पाटील नगर, धनकवडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी करण श्रीनिवास पाटील (वय २०), विवेक भाऊराव चोरगे (वय २४, दोघे रा. धनकवडी ) यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मध्यभागातील वाहतुकीत बदल; श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात होणार भाविकांची गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाटील आणि चोरगेबरोबर असलेल्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक याचा काही दिवसांपूर्वी आरोपींशी वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी आरोपींनी अभिषेकला धनकवडीतील एका पानपट्टीजवळ बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी आरोपी पाटील, चोरगे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांनी अभिषेक याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. अभिषेक गंभीर जखमी झाला असून त्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बेरड तपास करत आहेत.