पुणे : राज्यात शालेय शिक्षण विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइनरी नोंदवण्याच्या उपक्रमाला शुक्रवारपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी राज्यातील २६ हजार ७८६ शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली. येत्या आठवड्यात शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांमधील शिक्षकांनी स्विफ्टचॅट या मोबाइल ॲपद्वारे आपल्या वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यास सुरुवात केली. या प्रयोगामुळे वर्गात प्रत्यक्षात किती विद्यार्थी उपस्थित असतात, याची माहिती उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत शालार्थ क्रमांक असलेल्या शिक्षकांना ‘अटेंडन्स बॉट’द्वारे उपस्थिती नोंदवता येत आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा ‘युडायस’ क्रमांक आणि स्वत:च्या शालार्थ क्रमांकाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके) कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यासाठी अटेन्डन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना देण्यात आले आहे.