पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाच्या तांत्रिक तपासात आरोपीने केलेल्या संभाषणाची ऑडिओक्लिप मिळाली आहे. ऑडिओक्लिपच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात दिली. मोहोळवर गोळ्या झाडणारा आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने केलेल्या संभाषणाच्या ऑडिओक्लिपमधून अन्य काही जणांची नावे समोर आली आहेत. त्याअनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

या खून प्रकरणात आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, धनंजय वटकर, सतीश शेडगे, नितीन खैरे, आदित्य गोळे, संतोष कुरपे यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यानंतर आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. मोहोळ खून प्रकरणाच्या तपासात आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून, पौड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी चार पिस्तुलांचा वापर केला आहे. त्यापैकी तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

आरोपींना पिस्तुले पुरविणाऱ्या प्रीतसिंगचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांची नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी कोण उपस्थित होते, याचा तपास करायचा आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी सांगितले.

हेही वाचा : शरद मोहोळचा खून करणारा मुख्य सूत्रधार गणेश मारणे कोण आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी, तसेच कुरपेवगळता अन्य आरोपींना सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती तांबे यांनी न्यायालयाकडे केली. बचाव पक्षाकडून केतन कदम, ॲड. हेमंत झंझाड, ॲड. कीर्तीकुमार गुजर, ॲड. राहुल भरेकर यांनी बाजू मांडली. पोळेकर, कानगुडे, शेळके, गव्हाणकर, गांदले यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वटकर, शेडगे, खैरे, गोळे, कुरपे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.