उद्योगनगरीतील ७५० व्यावसायिकांना फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर धोक्याच्या लाल क्षेत्राबाहेर (नॉन रेड झोन) असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर महापालिकेने विविध दुकानांना तसेच व्यवसायांना परवानगी दिली. त्यानुसार सुरू झालेल्या वाहनदुरुस्ती व्यवसायाची चिंता मात्र अजूनही कायम आहे. दुरुस्तीसाठी वाहने येत नाहीत, सुटय़ा भागांची कमतरता आहे, कुशल कामगारांचा तुटवडा आहे, अशा अनेक अडचणींमुळे हा व्यवसाय अद्याप पूर्वपदावर येऊ शकलेला नाही.

देशभरात टाळेबंदी लागू केली, तेव्हापासून आजपर्यंतच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत वाहनदुरुस्ती व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाहनदुरुस्ती करणाऱ्या सुमारे ७५० व्यवसायांना पूर्णपणे अवकळा आली आहे. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होऊ लागली तसे पिंपरी पालिकेने तुलनेने अधिक सवलती जाहीर केल्या. त्यानुसार, आता १० ते ४ या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे वाहनदुरुस्तीच्या दुकानांमध्ये वाहनांची गर्दी होत नसल्याचे दिसून येते.

काही चालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, नेहमीच्या तुलनेत ७० ते ८० टक्के व्यवसाय कमी झाल्याचे ते सांगतात. पूर्वी दररोज ५० वाहने येत असतील तर सध्या दिवसाला ८ ते १० वाहने येतात. ग्राहक तुलनेने खूपच कमी झाले आहेत. टाळेबंदीमुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे वाहनांचा वापर होत नव्हता. करोनाचा संसर्ग वाढलेला पाहून अजूनही नागरिक बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाहीत. दुसरीकडे, बाजारात वाहनांचे हवे ते सुटे भाग मिळत नाहीत, किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे वाहनदुरुस्तीची कामे करताना अडचणी येतात. कुशल कामगार बाहेरगावी निघून गेले आहेत. ते तूर्तास परत येण्याची शक्यता कमी आहे. मिळेल त्या कामगाराकडून कामे करून घेताना विविध अडचणी जाणवतात. टाळेबंदीमुळे कितीही नुकसान झाले असले तरी, जागेचे भाडे देणे अनिवार्य आहे.

टाळेबंदीमुळे गॅरेज चालकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. आता दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली तरी वेळ मर्यादित आहे. अपेक्षित ग्राहक येत नाहीत. वाहनांचे सुटे भाग महाग मिळतात. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि पूर्वीप्रमाणे वाहनांच्या रांगा लागतील.

 – चैतन्य काची,दत्तात्रय ऑटो वर्क्‍स

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto repair business hit due to lockdown zws
First published on: 03-06-2020 at 00:35 IST