शहरात आज कडक बंदोबस्त

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करत असून विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात येणाऱ्या जल्लोषी मिरवणुकांवर पोलिसांकडून बंदी आहे.

कोरेगाव पार्क भागातील धान्य गोदामात मतमोजणी होणार असून मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी निमलष्करी दल तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तेथे तैनात करण्यात आल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतो. मतमोजणी केंद्राच्या परिसरात घोषणा देण्यात येतात. घोषणाबाजीमुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते. या भागातील अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून मतमोजणी केंद्राच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तासाठी राहणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण शहरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागातील घडामोडींवर पोलिसांची नजर राहणार असल्याचे शिसवे यांनी सांगितले.

कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल करण्यात आले असून मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी (२५ ऑक्टोबर) पूर्ण होईपर्यंत हे बदल लागू राहतील. या भागातील साऊथ मेन रस्ता तसेच लगतच्या उपरस्त्यांवरील गल्ल्यांमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाणे ते साऊथ मेन रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांकडून मिरवणुका काढण्यात येतात. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. – डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त