पुणे : ‘तीर्थक्षेत्र आळंदीजवळ मोशी-डुडुळगाव सीमेवर इंद्रायणी नदीच्या काठी कत्तलखाना होऊ देणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले असताना ‘केवळ तोंडी आश्वासन नको. यंदाची वारी पंढरपूरमध्ये पोहचण्यापूर्वी लेखी आदेश काढा’, अशी मागणी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत करत वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानाच्या आड आल्यास शांत बसणार नाही, असा इशारा दिला.
‘इंद्रायणी नदीच्या काठी चार एकर जागेवर प्रस्तावित कत्तलखाना हा वारकऱ्यांच्या श्रद्धेवर आघात करणारा आहे. वारकऱ्यांसाठी पूजनीय असलेल्या इंद्रायणी व चंद्रभागा नद्यांमध्ये सांडपाणी, कचरा आणि मांस सोडले जात असून या प्रदूषणावर तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी,’ अशी मागणी कराडकर यांनी केली.
समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संस्था आणि संघटनांकडून आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. या परिषदेला ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, अखिर भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट, श्री क्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाजाचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम, चिंताणी प्रासादिक दिंडींचे ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज आदी उपस्थित होते.
बंडातात्या कराडकर म्हणाले, ‘आषाढी वारीच्या धार्मिक सोहळ्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव, वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानावर होणारे आघात खपवून घेतले जाणार नाहीत. आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात यावे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडी आदेश देण्याऐवजी लेखी आदेश काढावेत. इंद्रायणी, चंद्रभागा, तापी, भीमा, गोदावरी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी.’
दरम्यान, ‘वारीच्या मार्गावर राजकीय पक्ष व संघटनांकडून स्वागत कक्ष उभा करून चित्रपट गीतांच्या चालीवरील गाणी लावली जात आहेत. पालखी सोहळा कला महोत्सव नसून शुद्ध विठ्ठल भक्तीची साधना आहे. त्यामुळे हे प्रकार त्वरित थांबवावेत. वारीच्या मार्गावर, तसेच आळंदी, पंढरपूर, देहू, मुक्ताईनगर, पैठण या प्रमुख वारकरी तीर्थक्षेत्रांपासून किमान पाच किलोमीटर परिसरात मांस व मद्यविक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. समाज माध्यमे, नाटक आणि चित्रपटात देवता, संत, संत वाङ्मय आणि धर्मग्रंथ यांची विडंबना करून समाजात द्वेष, गैरसमज आणि अविश्वास पसरवला जात आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच, नास्तिकतावादी संघटना आणि अन्य शहरी नक्षलवादी विचारसरणीच्या लोकांनी पंढरीच्या वारीत ‘समता दिंडी-पर्यावरण दिंडी’ या गोंडस नावाने उघडपणे शिरकाव केला आहे,’ असा आरोप सुनील घनवट यांनी केला. ‘वारीत सर्वांना सहभागी होण्याचा अधिकार मात्र या लोकांनी बुद्धिभेद करून छुपा अजेंडा चालवू नये,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. ‘वारी मार्गांवर धर्मांतरासाठी पुस्तके वाटणे, येशूचा प्रचार करण्याचे प्रकार घडले आहेत. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा लोकांवर सरकारने कारवाई करावी,’ अशी मागणी स्वामी भारतानंद सरस्वती यांनी केली.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन काय?
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात आळंदी-मोशी येथील जागेत कत्तलखान्यासाठी आरक्षण दाखविण्यात आले आहे. मात्र, ‘आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही. आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वत: दिले आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदाय, वारकरी नेत्यांना आश्वस्थ करू इच्छितो, की आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही.’ – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.