पुणे : वैमनस्यातून युवकाचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना बाणेर भागात घडली. तरुणाच्या डोक्यात पाईप घालून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
टोळक्याने केलेल्या मारहाणीत समर्थ योगेश ताम्हाणे (वय १७, रा. धनकुडे वस्ती, बाणेर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत ताम्हाणे याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हाणेच्या मित्राबरोबर आरोपींचे वाद झाले होते. वाद मिटवण्याच्या बहाण्याने ताम्हाणेला २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर बोलावून घेतले. आरोपींनी ताम्हाणेच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. ताम्हाणेच्या डोक्यात पाईप घातला, तसेच एका आरोपीने त्याच्यावर शस्त्राने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर तपास करत आहेत. शहरात किरकोळ वादातून बेदम मारहाण, तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहे. दोन दिवसांपूर्वी कोंढवा भागात आर्थिक वादातून दाम्पत्याने एका १४ वर्षीय मुलावर चाकूने वार केल्याची घटना घडली होती.