बारामती: बारामतीत डंपरसारख्या अवजड वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे. सोमवारी एका ज्येष्ठ नागरिकाचा डंपरच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मंगळवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मोटारीला डंपरची धडक बसली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.
सोमवारी फलटण रस्त्यावरील ढवाण पाटील चौकात झालेल्या अपघातात मारुती उमाजी पारसे (वय ७५) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त बारामतीकरांनी आंदोलन केले. त्यानंतर मंगळवारी शाहू हायस्कूलजवळ विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मोटारीला डंपरने धडक दिल्याची घटना घडल्यानंतर पाटस रस्त्यावर नागरिकांनी आंदोलन केले. तसेच, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय या मार्गे मोर्चा काढण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आंदोलकांशी चर्चा केली.