बारामती : बारामती शहरात अपघाताचे प्रमाण वाढल्याने अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेतच या वाहनांना शहरात प्रवेश करता येणार आहे.
शहरातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी मुख्याधिकारी पंकज भुसे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास नाळे, मोटार वाहन निरीक्षक बजरंग कोरावले आदी उपस्थित होते.
४५ वाहनांवर कारवाई
बारामती शहर व परिसरात प्रमाणापेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ४५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनमालकांवर खटले दाखल करून ते बारामतीतील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ४५ वाहनांच्या मालकांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांककडे पाठविण्यात आले असल्याचे चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरुम आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरला जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अपघातही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. जप्त केलेली वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. नागरिकांनी, वाहनचालकांनी सजग राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बारामती.