बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, मंगळवारी (२४ जून) होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे असलेल्या ‘ब’ गटाची मतमोजणी सुरुवातीला होणार असल्याने हा निकाल सर्वप्रथम हाती येईल.
बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८८.४८ टक्के मतदान झाले आहे. १९ हजार ५४९ मतदारांपैकी १७ हजार २९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. २१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ‘ब’ गटात उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार असून, या गटासाठी ९९ टक्के मतदान झाले आहे.
मतमोजणी ३४ टेबलांवर दोन फेऱ्यांत होणार आहे. त्यामध्ये ‘ब’ गटाची मतमोजणी सुरुवातीला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मतमोजणी केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले. ‘मतमोजणीच्या ठिकाणी २५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनेल यांच्यात चौरंगी लढत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनेलने युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा प्रचार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार हे विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा समोरासमोर आले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.