बारामती: बारामती शहर व परिसरात प्रमाणापेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि वाहनांवर कारवाई करून १४ वाहने जप्त करण्यात आले आहेत. या वाहनमालकांवर खटले दाखल करून ते बारामतीतील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी ही कारवाई केली. या कारवाईत १४ वाहने जप्त करण्यात आली असून, वाहनमालकांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांककडे पाठविण्यात आले असल्याचे चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरुम आणि इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरला जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अपघातही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त केलेली वाहने २ ते १० टनांपर्यंत माल नेत असल्याचे आढळून आले आहे. ही वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत.
वाहनमालक आणि चालकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. नागरिकांनी, वाहनचालकांनी सजग राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, बारामती