बारामती : विमानतळाच्या धर्तीवर बारामती शहरात बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दुमजली बसस्थानकाची राज्यात चर्चा होते. मात्र, बारामतीतील ग्रामीण भागातील बसस्थानकांची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.
बारामतीत विकासकामे ही बारामती शहर डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येत आहेत. त्याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाची साधने असली, तरी अनेक शेतकरी आणि विद्यार्थी यांना प्रवासासाठी एसटी बसवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील बसस्थानकावर थांबे नाहीत, तर स्थानकांची दुरवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे.
सुपे बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमधून बस आत व बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागते. बारामती शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत अनेक ठिकाणी काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहे. तसेच चकाचक रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण सुरू आहे. मात्र, तालुक्यातील बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसण्यासाठी योग्य जागा नाही, तसेच स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानकात जागोजागी कचरा पडलेला दिसून येतो.
बसस्थानक असले, तरी अनेक समस्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यास स्थानिक नेते नाराज होतात. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू, मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करावा लागतो. – सारिका कोळेकर, विद्यार्थिनी.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- बसस्थानके – ०६
- दररोज बस फेऱ्यांची संख्या – ७५०
- बस संख्या – १२७
- विद्यार्थी पास संख्या – ३०००
- मुक्कामी बस – २५
माळेगाव, पणदरे, सुपा या बसस्थानकांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अन्य बसस्थानकांत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. – रविराज घोगरे, आगार व्यवस्थापक, बारामती.