पुणे: ‘भविष्यातील साथरोगांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी नागरिकांसह प्रशासन, आरोग्य सेवा आणि संशोधन संस्था यांनी सज्ज राहावे’, असे मत भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थानचे (आयसर) प्रा. चैतन्य आठल्ये यांनी गुरुवारी व्यक्त केले.

‘वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीची जागृती असती, तर करोना काळामध्ये वेदनांचे प्रमाण कमी झाले असते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’मध्ये ‘जैवशास्त्र आणि महामारीचा रोख’ या विषयावर प्रा. चैतन्य आठल्ये यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

आठल्ये म्हणाले, ‘करोना विषाणूमुळे जगभरातील नागरिकांना संकटाला सामोरे जावे लागले. या सूक्ष्म जीवापासून सुटका मिळविण्यासाठी प्रशासन, आरोग्यसेवा, संशोधन संस्था कामाला लागल्या होत्या. त्यातही पुण्यातील सिरम आणि भारत बायोटेक संशोधन संस्थांनी लशींची निर्मिती करून त्या जगभर पोहोचवल्या. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.’

‘एखादा आजार आल्यानंतर त्यावर संशोधन करण्यासाठी वेळ लागतो. अनेक प्रयोग करावे लागतात. ब्रिटिश राजवटीत असताना भारतात प्लेगची साथ आली होती. त्या वेळी ब्रिटिशांनी हा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. अनेक वर्षांनंतर जगभरात करोना आजाराचे संकट आले. हे संकट रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक संशोधन संस्था कामाला लागल्या होत्या. विषाणूच्या संशोधनासाठी भारत पुढे होता’, असेही आठल्ये यांनी सांगितले.

आठल्ये म्हणाले, ‘प्राण्यातून माणसात, माणसातून प्राण्यात आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. रेबीज विषाणूदेखील घातक आहे. हा प्राण्यांतून माणसाला, प्राण्याला होतो. त्यामुळे कुत्री, मांजरे पाळण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.’