एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने एक हजार १४३ उमेदवारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भीक मागो आंदोलन केले . जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा, गणपती बाप्पा मोरया यंदाच्या वर्षी जॉईनिग लवकर होऊ द्या… अशा विद्यार्थ्याकडून घोषणा देण्यात आल्या. दरम्यान स्पर्धा परिक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणांने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सरकाराच्या दिरंगाईमुळे स्वप्निलला आत्महत्या करावी लागली असा आरोप करत ‘मी पण स्वप्निल लोणकर’ असे पोस्टर घेऊन उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा – पुणे : पत्नीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या मेहुण्याचा खून ; दाम्पत्यासह चौघे अटकेत
२०१९ मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत एक हजार १४३ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. हा निकाल लागून आता तीन वर्षाचा काळ लोटला. पण राज्य सरकारने आमच्या नियुक्त्या केल्या नाहीत. या सरकारच्या दिरंगाईमुळे स्वप्निल लोणकर या आमच्या मित्राला आत्महत्या करावी लागली. याला सरकार जबाबदार असून अजून किती स्वप्निल सारख्या उमेदवारांची आत्महत्या करण्याची हे सरकार वाट पाहणार आहेत. त्यामुळे या सरकारने आमच्या सर्वांच्या नियुक्त्या कराव्या, आज आम्ही भीक मागो आंदोलन करीत आहोत. आमच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील उपस्थित उमेदवारांनी यावेळी दिला.
