राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या कामाची माहिती दिली. तसेच सावित्रीबाईंनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात केलेल्या कामावरही भाष्य केलं हे सांगताना कोश्यारी यांनी आज मात्र, पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असं वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांनी समाजात बदल घडविण्यासाठी शाळा सुरू केली. त्या दरम्यान अनेकांनी विरोध केला, हल्ला केला. तरी देखील त्यांनी त्यांचं कार्य सुरू ठेवले. त्यामुळे आज समाजात अनेक बदल घडलेला दिसत आहे. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळ आणि प्लेगच्या साथीत खूप मोठं योगदान दिलं आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे.”

“पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही”

“ज्या प्लेगच्या साथीने तेव्हा देशभरात थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी नागरिकांना सेवा देण्याचे काम केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पण आता आपण ज्या करोना आजाराचा सामना करीत आहोत, त्यामध्ये एखाद्या पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा आणि मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही. हे आपण पाहिले आहे,” असं भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

“सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाउल ठेऊन पुढे जाण्याची गरज”

“त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीमध्ये नागरिकांची सेवा करीत मृत्यू झाला आणि आज आपण काय पाहतोय,” असा सवाल कोश्यारी यांनी उपस्थित केला. तसेच आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाउल ठेऊन पुढे जाण्याची गरज आहे,” असंही कोश्यारी यांनी नमूद केलं.

“पदकं जिंकणाऱ्यांमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय समाजातील मुलींची संख्या सर्वाधिक”

भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे विविध क्षेत्रात महिला पुढे जाताना दिसत आहेत. त्यातील मुख्य क्षेत्र म्हणजे क्रिडा क्षेत्रात मुलांपेक्षा सर्वाधिक जास्त पदके मुली मिळवत आहेत. पदकं जिंकणाऱ्यांमध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय समाजातील मुलींची संख्या सर्वाधिक आहे.”

“हा क्षण कधीच विसरणार नाही”

“या गोष्टीचं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जात असून आज मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे. हा क्षण कधीच विसरणार नाही. हा पुतळा विद्यापीठामध्ये येणार्‍या प्रत्येकाला कायम प्रेरणा देणारा ठरेल,” असं कोश्यारी यांनी म्हटलं.

हेही वाचा : आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते क्रांतिकारकांमुळे, महात्मा गांधी… : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सुनेत्रा पवार, विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एस.एन. उमराणी आदी उपस्थित होते.

More Stories onपुणेPune
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh koshyari comment on todays wife and childrens mentioning savitribai phule svk 88 pbs
First published on: 14-02-2022 at 17:04 IST