माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय’ पुरस्कार यंदा डी.आर. मेहता, अर्णब गोस्वामी, कालिकेश सिंगदेव आणि एम. एस. पिल्लई यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे समन्वयक राहुल कराड यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे. या पुरस्कारांचे वितरण गणेश कला क्रीडा कला मंच येथे ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
व्यवस्थापन क्षेत्रातील उत्तम शिक्षक म्हणून पुण्याच्या साधना सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड लीडरशिप डेव्हलपमेंटचे संस्थापक एम. एस. पिल्लाई यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’, ओरिसा मधील तरुणांनी राजकारणात यावे यासाठी लेजिस्लेटिव्ह असिस्टंट टू एमपीज्च्या साह्य़ाने अथक परिश्रम करून जनजागृतीसारखे महान कार्य केल्यामुळे लोकसभेचे खासदार कालिकेश सिंगदेव यांना ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार, टाईम्स नाऊ या वाहिनीच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडून जनजागृती करणारी सवरेत्कृष्ट व्यक्ती म्हणून वाहिनेचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ’ पुरस्कार आणि अपंग व्यक्तींसाठी लागणारे कृत्रिम अवयवांचे संशोधन करणारे व अपंगांना मोफत अवयवांचे वाटप करणारे राजस्थान येथील भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे संस्थापक डी. आर. मेहता यांना ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ’ पुरस्कार देण्यात आले आहेत. समाजात आपल्या कृतीने व सेवेने ज्यांनी देशाच्या नावलौकिकात भर टाकली आहे. तसेच विविध संस्था किंवा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.