पिंपरी: वाहन चोरी करणाऱ्या सराईत टोळीतील एका आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

असिफ शेरखान पठाण वय-२१, रा. सूसगाव, मुळशी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती. तेव्हा रामनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपीला पोलिसांनी हटकले. तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय बळावल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सदर परिसरात मोटार चोरण्यासाठी आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यास ताब्यात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे यांच्या पथकाने सखोल तपास केला असता, आरोपी असिफने साथीदार नितीन साबळे व अनिकेत ढगे (दोघेही राहणार सूस) यांच्यासह इतरही काही गुन्हे केल्याचे कबूल केले. हिंजवडी, वाकड, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, विद्यापीठ, दत्तवाडी, कोथरूड, चंदननगर, वारजे आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. चोरीस गेलेल्या १५ दुचाकी आरोपीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.