लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची न्यायालयाच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुद्देमाल कक्षातील जप्त दुचाकींची परस्पर विक्री केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

दयानंद गायकवाड, संतोष अंदारे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित करम्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी गेल्या वर्षी दुचाकी चोरटा बाळासाहेब घाडगे याला अटक केली होती. घाडगेकडून दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या ऊरळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून ऊरळी कांचन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आल्यानंतर मुद्देमाल कक्षातील नऊ दुचाकी तेथे नसल्याचे आढळून आले.

आणखी वाचा-पिंपरी : व्हिडीओ कॉल अन् महिलेच्या नावावर १९ लाखांचे कर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीत लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गायकवाड, अंदारे, पांढरे, दराडे यांनी मुद्देमाल कक्षातील नऊ दुचाकींची विक्री केल्याचे उघडकीस आले. दुचाकींची विक्री भंगार माल खरेदी करणारा इम्रान शेख याला करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शेखला अटक केली. चौकशीत दोषी आढळलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राजा यांनी सांगितले. पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ठेवण्यात येतो. न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुद्देमालाची विक्री किंवा लिलाव करता येत नाही. जप्त केलेल्या दुचाकींचे मालक न सापडल्यास न्यायालयाच्या आदेशाने दुचाकींची विक्री करण्यात येते.