पिंपरी : ‘अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारमधील मंत्री, आमदारांच्या घरात मात्र दिवाळीचा लखलखाट आहे. शेतकऱ्यांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार राेहित पवार यांनी केली. सरकारने मदतीचे पॅकेज फुगवून दाखविले असून, शेतकऱ्यांना केवळ आठ हजार २०० रुपयांची मदत मिळणार असल्याचेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीने सोमवारी देहूगाव येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपाेषणामध्ये आमदार पवार सहभागी झाले हाेते. त्यावेळी ते बोलत होते. वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज पाटील, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपोषणात सहभागी झाले होते.

आमदार पवार म्हणाले, ‘सरकारने ३२ हजार कोटी रुपये मदत करू असे सांगितले. प्रत्यक्षात बारा हजार कोटी रुपयांच्या पुढे मदत जाणार नाही. काही जिल्ह्यांसाठीच शासन आदेश काढले जात आहेत. प्रतिशेतकरी केवळ आठ हजार २०० रुपये मदत सरकारकडून केली जात आहे. शेतकऱ्यांचे केवळ आठ हजारांचे नुकसान झाले आहे का, विमा कंपन्यांची मदत सरकार स्वत:च्या नावावर घेण्याचा प्रयत्न करत आहे. पॅकेज फुगवून दाखविले आहे. तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली. त्यामुळेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजनेचा प्रस्ताव सरकारला दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘लक्ष विचलित करण्यासाठी शनिवारवाड्याचा मुद्दा’

‘जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत असून, राज्यातील एका मोठ्या मंत्र्यांचे नातेवाईकही यात भागीदार आहेत. निवडणूक काळात हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करणारे पैसा दिसला की हिंदुत्व, विचार बाजूला ठेवतात. जैन बोर्डिंगवरील लक्ष विचलित करण्यासाठीच शनिवारवाड्याच्या आवारात नमाजपठण केल्याचा मुद्दा भाजपने पुढे आणल्याचा आरोपही पवार यांनी केला.

‘शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला स्वतंत्र लढण्याचे आदेश’

एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या पक्षाला भाजप स्वतंत्र लढायला सांगणार आहे. तसा आदेश भाजपच्या श्रेष्टींकडून आला आहे. सन २०२९ ची लोकसभा, विधानसभा निवडणूक या दोन्ही पक्षांना स्वतंत्र लढावी लागणार आहे. दोन्ही पक्षाचे आमदार भाजपमध्ये जातील,’ असेही ते म्हणाले.