scorecardresearch

भाजपला ब्राह्मण उमेदवारांचे वावडे? ‘कोथरूड’ पाठोपाठ ‘कसब्या’तही डावलले

काँग्रेसकडून टिळक कुटुंबियातील रोहित टिळक यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भाजपला ब्राह्मण उमेदवारांचे वावडे? ‘कोथरूड’ पाठोपाठ ‘कसब्या’तही डावलले
शैलेश टिळक

पुणे : शेटजी-भटजींचा पक्ष अशी एकेकाळी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षालाच ब्राह्मण उमेदवारांचे वावडे असल्याचे कसबा पोटनिवडणूक उमेदवारीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना ‘कसब्या’ तून संधी दिली जाईल, अशी चर्चा असतानाच भाजप नेतृत्वाने शैलेश टिळक यांनाच उमेदवारी नाकारली. यापूर्वी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचीही पक्षाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारी नाकारली होती. या दोन्ही घटनांवरून भाजपला ब्राह्मण उमेदवार नको असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जो न्याय ‘चिंचवड’ मतदारसंघाला दिला तो न्याय ‘कसब्या’साठी का नाही, अशी विचारणाही आता ब्राह्मण समाजाकडून होत आहे.

दरम्यान, पुण्यात भाजपचा ब्राह्मण उमेदवार नसल्याने ही संधी साधत काँग्रेसकडून टिळक कुटुंबियातील रोहित टिळक यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. चार दशकांनंतर ब्राह्मणेतर उमेदवार देण्याच्या भाजपच्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून ब्राह्मण संघटनांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

शैलेश यांनी कुटुंबीयांपैकी एकाला संधी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मुक्ता यांचे पती शैलेश किंवा चिरंजीव कुणाल यांचा विचार होईल, अशी  शक्यता पक्षातूनच व्यक्त होत होती.  पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास तीन दिवस बाकी असताना भाजपने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली.  टिळक यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनीही त्याबाबतची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ‘उमेदवारी का दिली नाही हे माहिती नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शुक्रवारी रात्री चर्चा झाली होती. दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र उमेदवारी नाकारत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यावर पक्षाने अन्याय केला आहे,’ अशी प्रतिक्रिया शैलेश यांनी व्यक्त केली होती.

कोथरुडची पुनरावृत्ती

ब्राह्मण उमेदवार नाकारण्याची भाजपची ही दुसरी वेळ आहे. ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना  चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भाजपने डावलले. प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद  उमटले होते.  चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी कोथरूड ‘सुरक्षित’ मतदारसंघ असल्यानेच प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले होते.

काँग्रेसकडून खेळी ?

पारंपरिक आणि बालेकिल्ल्यातच भाजपने ब्राह्मण उमेदवार नाकारल्याने ही संधी हेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू झाला आहे. काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सहयोगी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असतानाच आता काँग्रेसने टिळक कुटुंबीयांतील रोहित टिळक यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे. ब्राह्मण उमेदवार देऊन काँग्रेसने कसब्यातील ब्राह्मणांची मते मिळविण्याची खेळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार दशके ब्राह्मण उमेदवाराचे वर्चस्व

अरविंद लेले, अण्णा जोशी यांच्यानंतर गिरीश बापट आणि मुक्ता टिळक या ब्राह्मण उमेदवारांनी अडीच-तीन वर्षांचा अपवाद वगळता सुमारे चाळीस वर्षे कसब्याचे एकहाती नेतृत्व केले. अरविंद लेले दोन वेळा कसब्याचे आमदार होते. युतीमध्ये शिवाजीनगर मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे शिवाजीनगरचे आमदार अण्णा जोशी हे कसब्यातून निवडणूक लढवून आमदार झाले होते. पुढे अण्णा जोशी खासदार झाल्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये गिरीश बापट यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्या निवडणुकीमध्ये वसंत थोरात यांचा विजय झाला होता. त्यामुळे ४० वर्षांपासून भाजपचा ब्राह्मण उमेदवार निवडणुकीत असायचा. त्या समीकरणाला भाजपने छेद दिला आहे.

भाजपने जगताप कुटुंबाला न्याय दिला तर टिळक कुटुंबावर अन्याय केला. मेधा कुलकर्णी यांच्यानंतर आता टिळक कुटुंबीयांची संधी नाकारली आहे. हा प्रकार चुकीचा आहे.

– आनंद दवे, हिंदू महासंघाचे नेते

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 01:18 IST