पुणे : शहरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्याच दरम्यान कोथरूड भागातील जीत मैदान येथे दांड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांना साऊंड चा त्रास होऊ लागला.त्यामुळे तेथील नागरिकांनी भाजपच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे याबाबत तक्रार केली.

त्यावर मेधा कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त, स्थानिक पोलीस प्रशासन यांना फोन करून कारवाईची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे दिसून येताच, मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन दांडिया चा कार्यक्रम बंद पडला.

त्यावेळी मेधा कुलकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या साऊंडमुळे काही गंभीर आजाराच्या रुग्णांना त्रास होत आहे. याबाबत माझ्याकडे नागरिकांच्या तक्रार आल्या आहेत. तसेच या ठिकाणी दरवर्षी कार्यक्रमाच आयोजन केले जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आला आहे.

आवाजाची मर्यादा ओलांडून आणि धार्मिकतेची सर्व बंधन तोडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे येथील कार्यक्रमाबाबत तक्रार केली. मात्र त्यावर कोणत्याही प्रकाराची कार्यवाही झाली नाही.त्यामुळे नाईलाजाने आम्हाला सनदशीर मार्गाने भंग करावा लागला, हा सत्याग्रह करावा लागला. आता येथून पुढे अशा प्रकारचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.