पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीप्रमाणे वर्चस्व राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ सुरक्षित करून घेतला आहे. या मतदारसंघाला कोथरूड मतदारसंघातील काही भाग जोडण्यात आला असून, मतदारसंघाची व्याप्ती वडगाव शेरी मतदारसंघापर्यंत वाढविण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या हक्काच्या भागांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला रोखण्याचे आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांपुढे असून, महाविकास आघाडी होणार की नाही, यावरच या दोन्ही पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भाजपने सामावून घेतले, तरच या मतदारसंघात मित्रपक्षांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उच्चभ्रू सोसायट्यांपासून झोपडपट्टी भागाचा समावेश आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही हे वर्चस्व कायम राखण्याच्या दृष्टीने भाजपने या मतदारसंघातील प्रभाग सुरक्षित करून घेतले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा काही भाग शिवाजीनगर मतदारसंघाला जोडण्यात आला आहे.

कोथरूड मतदारसंघातील पंचवटी, अभिमानश्री सोसायटीसह औंध, बाणेर, पाषाणचा काही भाग गोखलेनगर-वाकडेवाडी आणि बोपोडी-औंध प्रभागातील खडकी भागाला जोडण्यात आला आहे. या भागात भाजपचे हक्काचे मतदान आहे. ज्या भागात काँग्रेसचे मतदान आहे त्या भागाची मोडतोड करण्यात आली आहे. तर काही प्रभागाची व्याप्ती वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघापर्यंत वाढविण्यात आली आहे. पाटील इस्टेट, भोसलेनगर, अशोकनगर, कमलनयन बजाज उद्यान, साखर संकुल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वाकडेवाडी, संगमवाडी गावठाणासह मुळा रस्ता, इंदिरा गांधी वसाहत, जगदीशनगर, गोखलेनगर, जनवाडी, चतु:शृंगी मंदिर परिसर, पंचवटी-पाषाण, सकाळनगर, अभिमानश्री सोसायटी, शासकीय तंत्रनिकेतन, वन भवन, पत्रकारनगर आणि डेक्कन काॅलेज असा एक प्रभाग करण्यात आला आहे.

माॅडेल काॅलनी परिसरातील वडारवाडी, पीएमसी काॅलनी, गोखलेनगर, रामोशीवाडी या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबहुल भागाची मोडतोड करून भाजपने मित्रपक्ष शिवसेनेलाही शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मतदारसंघातील प्रभागातील एसटी आरक्षणही रद्द झाल्यात जमा आहे. महायुतीतील मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही (आठवले गट) धक्का बसणार आहे. पाषाण परिसरातील लमाणतांडा भाग औंध-बोपोडी भागाला जोडण्यात आला आहे. या मतदारसंघातील तीन प्रभागांची व्याप्ती मोठी ठेवल्याने निवडून येणारे नगरसेवक आणि नागरिकांसाठी हे प्रभागही जनसंपर्काच्या दृष्टीने अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

भाजपने हा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीने सुरक्षित करून घेताना मित्र पक्षांचा फारसा विचार केलेला नाही. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्याबरोबर युती झाली, तरच या दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजपच्या उमेदवारांनाच त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसची काही भागात मोठी ताकद आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार) हक्काचा मतदार तोडून तो वेगवेगळ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे. या मतदारसंघातील तिन्ही प्रभाग भाजपने सोयीचे करून घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसच्या मतदारांची विभागणी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) योग्य उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. महाविकास आघाडी स्वतंत्र लढल्यास भाजपला फायदा होण्याची जास्त शक्यता आहे.

दृष्टिक्षेप

प्रभाग प्रभागाचे नाव
गोखलेनगर-वाकडेवाडी
औंध-बोपोडी
१२छत्रपती शिवाजीनगर-माॅडेल काॅलनी