पिंपरी- चिंचवड : भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. “राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. माझी प्रतिमा मलीन करण्यात येत आहे. चुकीच्या गोष्टीत माझं नाव अडकवल जात आहे. पक्षाची बदनामी होत असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे.” अशी प्रतिक्रिया अनुप मोरे यांनी दिली आहे.
भाजपकडून पहिल्यांदाच प्रभागातील इच्छुकांना एका व्यासपीठवर आणण्यात माजी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना यश आले आहे. पिंपरी- चिंचवड शहरात हे पहिल्यांदाच घडलं आहे. अनुप मोरे म्हणाले, आगामी काही दिवसांमध्ये महानगर पालिका निवडणुका आहेत. प्रत्येक प्रभागात कार्यकर्ता मेळावा घ्यायचा अस आमचं ठरलेलं आहे. प्राधिकरण प्रभागातील ही तयारी सुरू आहे. या प्रभागातील इच्छुक एकाच व्यासपीठावर आले आहेत.
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी युवतीकडून अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर अनुप मोरे यांनी मौन सोडून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. मी एक भाजप चा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात चुकीचं काम करणार नाही. त्यामुळं कुठल्याही गुन्ह्यात माझा समावेश नाही. माझं केवळ नाव घेण्यात आलं आहे. अस पोलिसांनी सांगितले आहे. मी कुठल्याही घटनास्थळी नाही. केवळ राजकीय आकसापोटी माझं नाव त्या प्रकरणात गुंतवले आहे. मी पोलिसांना सहकार्य करत आहे. भाजप कार्यकर्ता असल्याने प्रथम पक्ष महत्वाचा आहे. माझ्यामुळं विरोधक पक्षाची बदनामी करत होते. हे व्हायला नको म्हणून नैतिकतेतून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप पक्ष सेवा करण्यासाठी सांगतो, चुकीचं काम करायला सांगत नाही. पण चुकीच्या गोष्टीत माझं नाव अडकवल्यामुळे पक्षाची बदनामी झाली.
ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर खोट्या केस आहेत का? हे कोर्ट ठरवेल. मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. मी स्वतः परस्परविरोधी तक्रार दिलेली नाही. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या यातून पक्षाला टार्गेट करण्यात आलं. विरोधक ही टार्गेट करत आहेत. भाजप युवा मोर्चाची पदाधिकारी असलेल्या युवतीने भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. युवतीने तिच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप ही केला आहे. या सगळ्यांवर अनुप मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.
