पत्नीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणातून मित्राच्या साथीने दोघांनी एका व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आखाड पार्टी साजरी करण्यासाठी बोलावून वादावादीतून हा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आनंद उर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा.पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सँडी नायर आणि बंडू थोरात या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत वैशाली जोरी (वय ३०) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. नवी पेठेतील गांजवेवाडी येथे घडलेली घटना गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या ती उघडकीस आली. खून झालेला आनंद जोरी, सँडी नायर आणि बंडू थोरात हे तिघे सराईत गुन्हेगार असून, एकमेकांचे मित्र आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद जोरी हा बंडू थोरात याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरत होता. त्याचा थोरात याला राग होता. जोरी हा दारूच्या नशेत थोरात याला दिसला. त्यानंतर त्याने मित्र सँडी नायर याला सोबत घेऊन बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गांजवेवाडी येथे आखाड पार्टी साजरी करण्याचा बेत आखला. 

दारुच्या नशेमध्ये दोघांनी धारदार शस्त्राने जोरी याच्यावर वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या तेथून पायी जात असलेल्या नागरिकास हा खून झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ विश्रामबाग पोलिसांना याबाबत खबर दिली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. सुरूवातीला जोरी याची ओळख पटली नव्हती. तपासानंतर पोलिसांनी जोरी याची ओळख पटवून दोघा संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी अपशब्द वापरत असल्याच्या कारणातून खून केल्याचे समोर आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली. पुढील चौकशीसाठी दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.