अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून आकर्षक योजनांच्या पायघडय़ा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांधकाम व्यावसायिकांवर वचक ठेवणारे स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी- रेरा) अस्तित्वात येण्यापूर्वीच गृहप्रकल्पातील शिल्लक सदनिका खपविण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताच्या निमित्ताने आकर्षक योजना जाहीर करून ग्राहकांना पायघडय़ा घालण्यात येत आहेत. विनाव्याज हप्ते, नोंदणी शुल्काची सूट, किरकोळ रक्कम भरून तातडीने गृहप्रवेश, गृहवस्तू आणि फर्निचरसह सदनिका, सोने भेट आदी वेगवेगळ्या योजना बांधकाम व्यावसायिकांनी पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरात जाहीर केल्या आहेत. काही प्रकल्पात प्रतिचौरस फुटांचा दर कमी केल्याच्याही जाहिराती करण्यात येत आहेत.

बांधकाम व्यावसायिकांकडून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या विविध तरतुदी असणारा ‘रेरा’ कायदा अस्तित्वात येत आहे. या पाश्र्वभूमीवर सद्य:स्थितीत सदनिकांच्या विक्रीबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या हालचाली सुरू आहेत. मागील काही वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मंदीची स्थिती आहे. नोटाबंदीनंतर मंदीचे मळभ आणखी गडद झाले आहे. त्यामुळे नवे गृहप्रकल्प जाहीर न करता आहे त्या प्रकल्पातील शिल्लक सदनिकांची विक्री करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘रेरा’ येण्यापूर्वी अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताची चांगली संधीही बांधकाम व्यावसायिकांना उपलब्ध झाली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहर व परिसरामध्ये मोठमोठय़ा प्रकल्पांमध्ये अनेक सदनिकांची विक्री झालेली नाही. मुहूर्ताच्या निमित्ताने आता या प्रकल्पांची जोरदार जाहिरात करण्यात येत आहे. सुमारे तीनशे प्रकल्पांचा समावेश असलेल्या प्रदर्शनाचेही शहरात नुकतेच आयोजन करण्यात आले. हिंजवडी परिसर, वाकड, द्रुतगती महामार्ग, पुणे- बंगळुरु बाह्यवळण मार्ग परिसर, गहुंजे क्रिकेट स्टेडियमजवळील परिसर, धानोरी, वाघोली, रावेत, मोशी, मांडरी, मारुंजी, उरुळी, माण, लोणीकंद, लोहगाव, चाकण, बावधान, पिसोळी, आळंदी- मरकळ रस्ता परिसर आदी भागांमध्ये सध्या मोठय़ा प्रमाणावर तयार गृहप्रकल्प आहेत. गृहप्रकल्पातील सदनिका खपविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करण्यात येत असून, त्यातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. १ ते ४ बीएचके आणि आठ ते दहा लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या सदनिका सध्या उपलब्ध आहेत. आयटी पार्क, विमानतळ, महामार्ग, बाह्यवळण मार्ग आदींपासून प्रकल्प जवळ असल्याचे दाखले देण्यासह विविध योजनांची जाहिरातींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रेरा’मुळे बांधकाम व्यावसायिकावर काही बंधने आणि जबाबदाऱ्या येणार आहेत. त्यामुळे पूर्वी बांधलेल्या आणि न खपलेल्या सदनिका विकण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. त्यासाठी जाहिरातीही होत असल्या, तरी सद्य:स्थितीमध्ये अद्यापही बाजार पडलेला आहे. त्यामुळे मुहूर्तावरील खरेदीलाही किती प्रतिसाद मिळतो, याबाबत शंका आहेत.

वेगवेगळ्या गृहप्रकल्पांतील आकर्षक योजना

* केवळ ५१ हजार रुपये भरून लगेचच गृहप्रवेश करण्याची संधी. घराच्या कर्जाचा हप्ता (ईएमआय) २०१९ पासून सुरू

*  दहा टक्के रक्कम भरल्यास (डाऊन पेमेंट) ४८ हप्त्यांना शून्य टक्के व्याज

*  सदनिकेचे बुकिंग केल्यानंतर आठ दिवसांत नोंदणी केल्यास नोंदणी शुल्क, व्हॅट आकारणी नाही.

*  बुकिंगवर दहा ग्रॅम सोने किंवा एलईडी टीव्हीची भेट.

*  संपूर्ण फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूसह सुसज्ज सदनिका

*  प्रतिचौरस फुटाच्या दरांमध्ये चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत सूट

*  एकत्रित उत्पन्न १८ लाखांच्या आत असणाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत अडीच लाखांचे केंद्रीय अनुदान

*  सोलर, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअर फोन, जनरेटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा

*  वरच्या मजल्यांवर सदनिका घेणाऱ्यांना विशेष सवलत

*  अगदी थोडक्या कालावधीत ८० टक्के रक्कम कर्जाने मिळण्याची सुविधा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Builders try to sell flat before implement of new real estate law
First published on: 25-04-2017 at 02:35 IST