पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोटारीतील टेप चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. चोरटय़ांच्या उच्छादामुळे मोटारचालकांकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आठवडय़ातील प्रत्येक शनिवारी मध्यरात्री मुंबईहून पुण्यात येऊन मोटारीतील टेप लांबवणाऱ्या चोरटय़ांचा छडा विश्रांतवाडी पोलिसांनी नुकताच लावला. पोलिसांना पाहून मोटारीतून पसार होताना मोटार क्रमांकाची पाटी पडली आणि या पाटीवरुन पोलिसांनी तपास करुन चोरटय़ांचा माग काढला. त्यांच्याकडून चाळीस कारटेप, एक पिस्तूल तसेच काडतुसे असा माल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने पुणे,मुंबई, ठाणे आणि बंगळुरुतून दीडशे टेप चोरल्याची कबुली दिली आहे.

पुणे शहर तसेच विश्रांतवाडी परिरसरात मोटारीतील टेप चोरीला जाण्याचे गुन्हे घडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले होते. दर शनिवारी अशा प्रकारचे गुन्हे विश्रांतवाडी परिसरात घडत होते. त्यामुळे परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडून संशयित मोटारींची तपासणी सुरु करण्यात आली होती. मात्र, चोरटय़ांचा माग लागत नव्हता. २५ मार्च रोजी विश्रांतवाडीतील साप्रस परिसरातून पहाटे एक मोटार वेगाने निघाली होती. पोलिसांनी मोटारीला थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने वेग वाढविला आणि तो आळंदी रस्त्याने पसार झाला. दरम्यान, पसार होताना मोटारीच्या मागील बाजूस असलेली वाहन क्रमांकाची पाटी रस्त्यात पडली होती. पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. काही अंतरावर रस्त्यावर पडलेली वाहन क्रमाकांची पाटी पोलिसांनी ताब्यात घेतली. वाहनाच्या क्रमांकाची पाहणी करण्यात आली, तेव्हा मोटार मुंबईतील असल्याचे समजले.  त्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले. मोटारचालकाकाडे चौकशी करण्यात आली, तेव्हा मोटार त्याचा नातेवाइक साहिल जमील कुरेशी (वय २२,रा. रॉयल रेसीडन्सी, नवी मुंबई) हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. साहिलचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, साहिलबरोबर असलेला एक साथीदार मोहमद जाहीद लोहार (वय  ४१,रा. गाझीयाबाद, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. लोहारची चौकशी करण्यात आली, तेव्हा साहिल आणि त्याचा साथीदार अख्लाख हुसेन शेख (वय ३१,रा.गोवंडी, मुंबई) हे पुण्यात येऊन मोटारीतील टेप चोरी करत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, साहिल आणि अख्लाख हे दुचाकीवरुन विश्रांतवाडी भागात येणार असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या तपासपथकाला मिळाली. साहिल आणि अख्लाख यांना सापळा लावून पकडण्यात आले. तेव्हा त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी मोटारातील टेप चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वीस टेप जप्त करण्यात आले.  साहिल, अख्लाख आणि मोहमद यांनी मोटारीतून चोरलेल्या टेपची विक्री केली असल्याचा संशय पोलिसांना होता. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्यांनी मुंबईतील भेंडीबाजार परिसरात चोरीचा माल विकत घेणारा शौकत इस्माईल कुरेशी (वय ४५) याला मोटारीतील टेप विकल्याची माहिती दिली. शौकतला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. शौकतकडून आणखी वीस टेप जप्त करण्यात आले.  या टोळीकडून चाळीस टेप, एक पिस्तूल, सहा काडतुसे आणि मोटार असा माल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त साकोरे, सहायक आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल मोहिते, अभिजित चौगुले, उत्तम कदम, सुनील खंडागळे, प्रफुल्ल पटेल, सुभाष आव्हाड, प्रवीण भालचिम, विनोद मुधोळकर, किशोर दुशिंग यांनी चोरटयांना पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मोटारीतील टेप चोरी प्रकरणात साहिल, अख्लाख, मोहमद, शौकत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपी साहिलच्या वडिलांना गुजरात पोलिसांनी मोटारीतील टेप चोरी प्रकरणात अटक केली होती. या गुन्ह्य़ात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. आई-भावासह तो मुंबईत राहत होता. काही काळ त्याने विश्रांतवाडी भागात एका छोटया व्यावसायिकाकडे काम केले होते. त्याला पैशांची गरज असल्याने चोरबाजारातील शौकतकडे तो गेला होता. तेव्हा शौकतने त्याला मोटारीतील टेप चोरीत पैसे मिळतील, असे सांगितले होते. शौकतने त्याला मोटारीतून टेप चोरल्यास कमी श्रमात पैसे मिळतील, असे सांगितले होते. त्यानंतर साहिलने साथीदारांसोबत मोटारीची काच फोडून  टेप चोरण्यास सुरुवात केली. या टोळीने पुणे,मुंबई, ठाणे आणि बंगळुरुतून दीडशे टेप चोरल्याची कबुली दिली आहे. स्क्रु ड्रायव्हरचा वापर करुन काही मिनिटात टेप चोरून नेण्यात साहिल आणि त्याचे साथीदार वाकबगार आहेत.

rahul.khaladkar@expressindia.com