लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: कोरेगाव पार्क भागातील ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारावर बेकायदा जमाव करुन आश्रमाच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध घोषणाबाजी तसेच आश्रमात प्रवेश करण्याच्या प्रयत्न केल्या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी १०० ते १२० अनुयायांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, ओशो आश्रम परिसरात घोषणाबाजी करुन पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी एकाच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून धनेशकुमार रामकुमार जोशी तथा स्वामी ध्यानेश भारती (वय ६५, रा. बंगला क्रमांक १७, गल्ली क्रमांक १, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद त्रिपाठी तथा प्रेम पारस, सुनील मिरपुरी तथा स्वामी चैतन्य कीर्ती, गोपाल दत्त भारती तथा स्वामी गोपाल भारती, राजेश वाधवा तथा स्वामी धन्या अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल तथा स्वामी प्रेम अनवी, जगदीश शर्मा तथा स्वामी अमन विस्मय, आरी राजदान तथा कुनिका भट्टी तसेच न्यू इंडिया मीडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह १०० ते १२० जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- पुण्यात ओशोंच्या अनुयायांचा धुडगूस, आश्रमाचा गेट तोडून अनुयायी आत घुसले, पोलिसांचा लाठीचार्ज

ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि अनुयायांच्या गटात वाद सुरू आहेत. ओशो आश्रमाच्या परिसरात बुधवारी (२२ मार्च) मोठ्या संख्येने अनुयायी जमले होते. त्या वेळी ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करण्यात आली. बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रस्टच्या सदस्य साधना (वय ८०) यांना धक्काबुक्की करण्यात आली. न्यू इंडिया न्यूजचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांनी पत्रकार असल्याचे सांगून आश्रमात बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ओशो आश्रमाच्या परिसरात घोषणाबाजी करुन धक्काबुक्की केल्या प्रकरणी पोलिसंनी वरुण विनीत रावल (वय २७,रा. भिलाई, छत्तीसगड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस कर्मचारी परदेशी, सहकारी उपनिरीक्षक संभाजी नाईक, गणेश कस्पटे, नदाफ बंदोबस्तावर होते. त्या वेळी रावलने ‘ओशो, ओशो’ अशी घोषणाबाजी करुन ट्रस्टचे व्यवस्थापक धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घातला. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. तेव्हा रावलने पोलिसांशी वाद घालून धक्काबुक्की केली, असे पोलीस नाईक परदेशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लिगाडे तपास करत आहेत.